मुंबई – सध्या हिंदी इंडस्ट्री असो वा मराठी सर्वत्र जणू बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या जीवनावरही चित्रपट आले आहेत आणि येतही आहेत.दोन वर्षांनी पूर्वी मोठ्या पडद्यावर ‘धर्मवीर’ हा सिनेमा आला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची गणितचं बदलली. त्यातच आता धर्मवीर-2 सिनेमाही येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटच्या प्रदर्शनानंतर राजकारणात आणखी बदल होईल का याची चर्चा सुरू आहे. त्यातच “मला काही सांगायचंय !” हे एकनाथ शिंदेंच्या जीवनावर आधारीत नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कोण असणार मुख्य भूमिकेत?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवनावर आधारित या नाटकामध्ये अभिनेता संग्राम समेळ हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डाकडे आहे. तसेच येत्या दोनच दिवसांत या नाटकाची अधिकृत घोषणा होणार असल्याचं सांगितलं जातंय. “मला काही सांगायचंय !” हे नाटक एकपात्री आहे.
अजून एका नाटकाची चर्चा…
दरम्यान सध्या आणखी एका नाटकाच्या पोस्टरची चर्चा सुरु आहे. “50 खोके एकदम ओक्के” असं हे पोस्ट आहे. दरम्यान पुढे या पोस्टरवर काय ते रस्ते, काय ते खड्डे, तरीपण म्हणायचं एकदम ओक्के, असं लिहिण्यात आलं आहे. तसेच कलाकारांच्या नावाच्या इथेही, ‘सरड्यालाही लाजवतील असे रंग बदलणारे..’ असा आशय लिहिण्यात आला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलेली शिंदे आणि ठाकरे गटाची लढाई आता मराठी रंगभूमीवरही पाहायला मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे.