कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय संविधान अमृत महोत्सव कोल्हापूर जिल्ह्यात भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी आज नियोजनाची दूसरी बैठक मिस् क्लार्क बोर्डींग कोल्हापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या स्वाती काळे या होत्या. सुरवातीस भाऊसो काळे यांनी स्वागत केले. निमंत्रक विद्याधर कांबळे यांनी प्रास्ताविक करताना आपल्या जीवनातील भारतीय संविधानाचे मुल्य लक्षात घेता त्यांचा अमृतमहोत्सव भव्य प्रमाणात साजरा करून सर्व समाजाला त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा महोत्सव प्रेरणादायी ठरावा असे सांगितले.
रमेश जाधव यांनी प्रासंगिक उद्देशाऐवजी निरंतरपणे कार्यक्रम घेण्यात यावेत. जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सामावून घ्यावे आणि संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली. आंबेडकरी चळवळीच्या नेत्या रुपा वायदंडे यांनी सत्ता कुणाचीही असो आमच्या वाट्याचा संघर्ष कधी संपला नाही केवळ निवडणुकीसाठी संविधानाचा वापर होत असल्याची खंत व्यक्त करून संविधानाच्या संरक्षणाची आपली जास्त जबाबदारी असून हे संविधान घरघरात पोहचवून विचारांची घुसळण व्हावी,बहुजन समाजाचे प्रबोधन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात स्वाती काळे यांनी बांधकाम कामगार, विद्यार्थी, महिला बचत गट यांचाही सहभाग वाढवून महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन केले.यावेळी टी एस कांबळे, बाळासाहेब साळवी, रोहिणी पाटील, प्रशांत अवघडे, माणिक कांबळे,यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस दाविद भोरे, उदय कंगणे, सुरेश कांबळे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.