कोल्हापूर (प्रतिनिधी) : 1971 च्या विजय दिवसानिमित्त , बांग्लादेश वार मध्ये भाग घेवून, मेडल्स मिळवलेल्या शुर सैनिकांचा विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य आणि उच्च अधिकारी यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला. भारत-पाकिस्तानमधील 1971 युद्धाच्या विजय दिनानिमित्त विवेकानंद महाविद्यालय, सैनिक फेडरेशनतर्फे विवेकानंद महाविद्यालयातील डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवनात 1962, 1965, 1971 च्या युद्धातील आणि त्यानंतरच्या युद्धजन्य स्थितीमधील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिकांचा हा सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी कर्नल देशपांडे बोलत असताना म्हणाले, देशाचे ऐक्य आणि अखंडता टिकविण्यासाठी भारतीय स्थलसेना, नौसेना, वायूसेनेच्या सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या अतुल्य पराक्रमामुळे आज आपण अखंड विश्वात सुरक्षित नागरिक आणि महासत्ता म्हणून उदयास आलेलो आहोत. भारतीय सैनिकांचे निरनिराळ्या युद्धजन्य परिस्थितीत केलेले कार्य हे साहस, वीरतेप्रमाणे आहे. सैनिकांच्या या अखंड त्याग वृत्तीमुळे भारताचे सार्वभौमत्व चिरंतन टिकून आहे,’ असे गौरवोद्‌गार कर्नल आर. एन. देशपांडे यांनी केले. सैनिक फेडरेशन, आयक्यूएसी सेलतर्फे आयोजन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील 250 माजी सैनिक उपस्थित होते.

कर्नल विजय गायकवाड, कॅप्टन एन. एन. पाटील, कॉर्पोरल एम. डी. देसाई, सीपीओ पठाडे, सीईपी पृथ्वीराज देसाई, कॅप्टन चव्हाण, कॅप्टन कांबळे यांना विवेकानंद महाविद्यालयातर्फे सन्मानपत्र, मानचिन्ह देऊन सन्मानित केले. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्रा. डॉ. श्रुती जोशी, कर्नल मानस दीक्षित, कर्नल संधान मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले. यावेळी शहाजी कॉलेज, न्यू कॉलेज, छत्रपती शाहू कॉलेज, कॉमर्स कॉलेजमधील एनसीसी छात्र उपस्थित होते. लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी प्रास्ताविक केले. फेडरेशनचे अध्यक्ष बी. टी. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. विश्वंभर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मेजर सुनीता भोसले यांनी आभार मानले.