मुंबई (प्रतिनिधी) : दिवंगत प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा एनडी स्टुडिओचा ताबा गोरेगाव फिल्मसिटीने घेतला आहे. राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेंनी एनडी स्टुडिओची पाहणी केली. त्यामुळे हा स्टुडिओ आता राज्य सरकारच्या ताब्यात आला आहे. तर 2 ऑगस्ट 2023 मध्ये या स्टुडिओतच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येमुळे कला क्षेत्रात खळबळ उडाली होती.

भारतातला अव्वल कलादिग्दर्शक अशी नितीन चंद्रकांत देसाई यांची ओळख होती. 1942 लव्ह स्टोरीपासून नितीन देसाईंची घोडदौड सुरू झाली. तर लगान, देवदास, जोधा अकबर अशा एक से बढकर एक चित्रपटांमधल्या भव्य दिव्य सेटचे बॉलिवूडमध्ये नवे बेंचमार्क सेट केले. काही हॉलिवूड सिनेमांसाठीही त्यांनी योगदान दिलं.

तर प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथांचं कलादिग्दर्शनही चंद्रकांत देसाईच करायचे. त्याचबरोबर लालबागच्या राजाचा सेटही नितीन चंद्रकांत देसाईच उभारायचे. नितीन देसाई यांनी आर्थिक अडचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्यांनी उभारलेल्या एनडी स्टुडिओवरचं अडीचशे कोटींचं कर्ज न फेडल्यानं जप्तीची कारवाई होणार होती, अशीही चर्चा आहे.

तर बॉलिवूडमधला एक गट एनडी स्टुडिओमध्ये शूटिंग होऊ देत नव्हता, असा आरोप देसाईंच्या निकटवर्तीयांनी केला होता.