कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरातील शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेती करण्यास आणि नैसर्गिक शेतीचा आवाका वाढविण्यास उपयुक्त असलेल्या केंद्र शासनाच्या ‘नॅशनल, मिशन ऑन नॅचरल फार्मिंग’ योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 40 गटांचे लक्षांक असून 2 हजार हेक्टर क्षेत्रावर या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. याकरिता 5 कोटी 99 लाख रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातून इच्छुक 125 शेतकऱ्यांना प्रती शेतकरी 1 एकर क्षेत्रासाठी सहभागी करुन घेण्यात येणार असून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येकी दोन कृषी सखींची निवड करण्यात येणार आहे. या कृषी सखींकडून इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज संकलित करून त्यांना नैसर्गिक शेती गटात समाविष्ट करण्यात येणार आहे. नैसर्गिक पद्धतीवर आधारित स्थानिक पशुधन शेती पद्धती लोकप्रिय करणे, जमिनीचा पोत सुधारणे, बाहेरुन निविष्ठा खरेदीचे प्रमाण कमी करुन शेतावरच आवश्यक निविष्ठा निर्मिती करणे आणि त्याचा वापर वाढवणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
याबाबत आत्मा विभागाला सूचना देताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, जिल्ह्यातील नाचणी पिक, ऊस, नैसर्गिक शेतीशी संबंधित प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध करा, जेणेकरुन यातून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल. सूक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करा. भात आणि नाचणी पिकामध्ये मुल्य वर्धनासाठी प्रयत्न करा. चंदगड, पन्हाळा व इतर तालुक्यात रेशीम क्लस्टर करण्याबाबत कार्यवाही करा. जिल्ह्यातील रिसोर्स फार्मर यांचा कृषी विस्तार कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक म्हणून समावेश करा, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील प्रलंबित लाभार्थ्यांची ई केवासी, आधार प्रमाणीकरण, लँड सीडींग बाबत एका आठवड्यात गाव निहाय शिबीर आयोजित करुन याची पूर्तता करावी. तसेच पीएमकिसान योजने मध्ये वन पट्टा धारक शेतकऱ्यांची स्वयं नोंदणी पूर्ण करावी. मुख्यमंत्री 100 दिवस कृती कार्यक्रमामध्ये PMFME योजने मध्ये प्रत्येक कृषी सहायकांनी 5 अर्ज मंजूर होतील, असे प्रक्रिया उद्योग करणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करावी. तसेच कृषी सहायक यांच्या कार्यक्षेत्रात 1 ड्रोन खरेदी करण्याबाबत शेतकरी लाभार्थी निवड करावी. मनरेगा योजने मधून रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी सहायक यांनी किमान 1 एकर तुती लागवड करणारे शेतकरी तयार करून मार्गदर्शन करावे. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेमधील कागदपत्रा अभावी प्रलंबित लाभार्थी यांची 1 आठवड्यात तालुका कृषी अधिकारी यांनी कागदपत्र पूर्तता करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.