मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूकीत काँग्रेस महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला पुर्ण चित्र पालटलं. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्विकारत नाना पटोले यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा, अशा आशयाचं पत्र नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
नाना पटोले काय म्हणाले ..?
नाना पटोले यांनी खरगे यांना लिहून सांगितलं आहे की, जबाबदारीतून मुक्त करावे, गेल्या 4 वर्षांपासून मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असल्याचंही पटोलेंनी सांगितलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्यामध्ये, काँग्रेस महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. या निकालानंतरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन नाना पटोले पायउतार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
मात्र, नाना पटोले यांनी राजीनाम्याचा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे त्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच, नाना पटोले यांनी स्वत:च राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष पदातून पदमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागून राहिलं आहे.