पुणे – राज्यात विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत. याकरिता प्रत्येक राजकीय पक्ष आपपल्या परीने तयारीला लागला आहे. राज्यातील विविध मतदारसंघांवर दावे प्रतीदावे करण्यात आले असून कोणत्या योग्य उमेदवारला उमेदवारी द्यायची याकरिता राजकीय पक्षांनी बैठका घेत आहेत. आज पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असता, या बैठकीत नाना पटोले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. या सल्ल्यावरून महाविकासआघाडीमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
नाना पटोलेंनी कोणता सल्ला दिला ..?
नाना पटोले यांनी असे वक्तव्य केले की, राष्ट्रवादीच्या विभाजनाचा आपण फायदा करून घेऊ, तसेच पुण्यातील जास्तीत जास्त जागा आपण आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करू. पुण्यामध्ये काँग्रेसची ताकद आहे पण कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे आहे. वेळेवर ब्लॉकच्या मीटिंग व्हायला हव्यात. उमेदवार कोण आहे यापेक्षा काँग्रेस संघटनेला महत्त्व द्या. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतभेद न ठेवता एक दिलाने काम केल्यास यश आपलेच आहे असा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे.
पुण्यात एकूण 21 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यामध्ये पुरंदर विधानसभा मतदार संघातून संजय जगताप, भोर मतदार संघातून संग्राम थोपटे तर कसबा विधानसभा मतदार संघातून रवींद्र धंगेकर असे एकूण 3 आमदार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न कॉंग्रेसचा असणार आहे असंही ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला चांगलं यश प्राप्त झालं असून महाविकास आघाडीमध्ये सर्वांधिक जागा पटकावणारा कॉंग्रेस पक्ष ठरला आहे. त्यामुळे कॉंग्रेस विधानसभेच्या जास्त जागा मिळवण्यासाठी आग्रही राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आ. सुनील शेळके यांना पक्षातूनच विरोध होत असताना आता त्यांनी मोठा डाव टाकला आहे. शेळकेंनी काँग्रेसचा ज्येष्ठ नेता हेरला असून लवकरच ते त्यांना आपल्यासोबत घेणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे डॉ. किरण शंकरराव गायकवाड हे सुनील शेळके यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती देखील सध्या मिळत आहे. त्यामुळे मावळमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.