कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनेक घरगुती गणेशमूर्तींचे दीड दिवसात विसर्जन होते. उद्या (रविवार) रोजी होणाऱ्या विसर्जनासाठी मात्र महापालिकेची अनास्था दिसून आली. पंचगंगा नदीकाठी आणि परिसरात ठिकठिकाणी कचरा, निर्माल्यांचे ढिग साठले आहेत. पुराचे पाणी आल्यानंतर जी स्वच्छता अपेक्षीत होती, ती झाली नसल्याने प्रचंड अस्वच्छता पंचगंगेच्या तीरावर दिसून आली.

धक्कादायक म्हणजे नदीशेजारील असलेल्या एका नाल्याच्या गटारीचे पाणी वाहत येऊन ते पंचगंगा नदीत मिसळत होते. यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला. या संदर्भात जुना बुधवार अन्याय निवारण समितीने एक आठवड्यापूर्वी महापालिका आयुक्तांना पंचगंगा नदी परिसराची स्वच्छता करावी आणि श्रीगणेश आगमनापूर्वी रस्त्यांमधील खड्डे मुजवावीत, असे निवेदन दिले होते.

या निवेनावर महापालिकेडून कोणतीही कारवाई झालेली दिसून आली नाही. शहरातही अनेक रस्त्यांवर खड्डे दिसून आले असून त्यामुळे भाविकांना गणेशमूर्ती घेऊन जाताना कसरत करावी लागत होती.