मुंबई : विशाळगड आणि गजापुरात झालेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशाळगड अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी उजव्या विचारसणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचे प्रकरण गुरूवारी उच्च न्यायालयात पोहोचले. यावर आज तातडीने सुनावणी पार पडली. यावेळी पावसाळ्यात सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवा, सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोड कारवाई नको, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

दरम्यान, अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने हाती घेतलेली मोहीम तसेच विशाळगड अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी उजव्या विचारसणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचे प्रकरण गुरूवारी उच्च न्यायालयात पोहोचले. त्यावेळी, कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांना विशाळगडावरील बांधकामे पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन प्रकरणावर शुक्रवारी तातडीची सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. आज यावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणेवर ताशेरे ओढलेत. न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी प्रशासनाला खडेबोल सुनावले. यावेळी न्यायालयाने विशाळगडावरील कारवाई तातडीने थांबवण्याचे निर्देशही दिले.

पावसाळ्यात कुठलीही कारवाई करू नये. त्यामुळे सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवा, सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोड कारवाई नको, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. भर पावसात तिथल्या बांधकामावर हातोडा चालवण्याची काय गरज होती?,असा सवालही न्यायालयाने विचारला. विशाळगडावर आंदोलकांनी मशिदीवर चढाई केल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप गंभीर आहे, असे निरीक्षण न्यायालयाने म्हटले.

पावसाळ्यात अतिक्रमणांवर कारवाई न करण्याचा शासननिर्णय
पावसाळ्यात अतिक्रमणांवर कारवाई न करण्याचा शासननिर्णय आहे. त्यानंतरही ही कारवाई करण्यात आल्याची बाबही याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आली. तसेच, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. न्यायालयानेही ती मान्य केली. विशाळगड येथील हजरत पीर मलिक रेहान दर्ग्यासह घरे, दुकाने आणि इतर बांधकामांवर करण्यात येत असलेल्या कारवाईला याचिकेवर अंतिम निकाल दिला जाईपर्यंत स्थगिती देण्याची मागणी तीन याचिकांद्वारे करण्यात आली आहे.

याचिककर्त्यांचा आरोप
शाहूवाडीच्या तहसिलदारांनी विशाळगड परिसरात प्रवेश करण्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. शिवाय, गडाच्या पायथ्याशी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. त्यानंतरही, राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखालील उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते विशाळगडाच्या पायथ्याशी जमले, त्यांनी गडावर गेले आणि दर्गा तसेच त्या परिसरात असलेल्या घरांचे नुकसान केले. आंदोलकांनी महिला आणि लहान मुलांनाही मारहाण केली. दुसरीकडे, स्थानिक प्रशासनानेही बांधकामांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यालाही हिंसक वळण लागल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.