सातारा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवारांची यादी आता जाहीर केली आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. नेत्यांनी एकमेकांवर टीका केली असून पक्षांतर देखील वाढले आहे. आता शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.
उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. फोडाफोडीचे राजकारण शरद पवार यांनी सुरु केल्याची टीका उदयनराजे भोसले यांनी केली. ते म्हणाले की, ‘खासदार शरद पवारांना राजकारणातील फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे. शरद पवारांचा पूर्वी बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व आठही जागांवर महायुतीचेच उमेदवार मताधिक्याने विजयी होतील. राजकीय फोडाफोडी झाली कोण कोणीकडे गेले तरी, खरा मुद्दा जनतेच्या विकासाचा. आणि जनविकासाचे प्रचंड काम भाजप आणि महायुतीने केल्याने सातारा जिल्हा हे पूर्वी कोणाचेही प्रभावक्षेत्र असले तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, उमेदवारांनी विकासाच्या प्रगतीपुस्तकावर बोलावे,’ असे म्हणत खासदार उदयनराजे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
तसेच मराठा आरक्षणवरही खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘मनोजची मराठा आरक्षणाची मागणी रास्त आहे. पण, त्याचे राजकीय भांडवल करणे, भाजपवर रोष व्यक्त करणे योग्य नाही. जाती-पातीत भेदभाव हे सारे चुकीचे आहे.’