मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन बुधवार, 19 जूनला राज्यभरात साजरा केला जाणार आहे. शिवसेनेत फुट पडल्याने यंदाही दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत. परंतु त्या आधी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाकयुद्ध सुरु झालं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्वतःला खरी शिवसेना समजणाऱ्यांनी एकदा आरशात पाहावं, तसेच “जिथे ठाकरे तिथे शिवसेना, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

प्रसार माध्यमांसमोर खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्या शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आहे. हिंदुहृदयस्रमाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना केली. आता उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचे नेतृत्व करत आहे. शिंदे यांचा शिवसेनेशी काय संबंध? हिंदुहृदयस्रमाटांच्या विचारधारेशी बेईमानी करत महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हातमिळवणी करणारे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करू शकत नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. आमचा उद्या मोठा कार्यक्रम आहे. संपूर्ण देशातून लोकं येणार आहे. येत्या विधानसभा निवडणूकीत काय रणनीती असणार त्याविषयी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, असे यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
“उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षांपूर्वी शिवसेनेचा पाया घातला. 58 वर्षांपासून बाळासाहेबांची शिवसेना मुंबई, महाराष्ट्र, दिल्लीत काम करतेय. आम्ही तेव्हापासून त्यांच्या विचारांनी भारावलेले सर्व तरुण, तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारांनी भारावून आम्ही भगवा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला. आम्ही सर्वांनी तुरुंगवास भोगला पण आम्ही आमच्या पक्षाशी इमान कायम ठेवला,” असे राऊत म्हणाले.

“आता जर कोणी म्हणत असेल ते शिंदे गट आमची शिवसेना खरी तर त्यांनी स्वतःला आरशात पहावं. बाळासाहेबांनी शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते? डोम नावाच्या सभागृहात कुठेतरी हे दोन कावळे उद्या जमणार आहेत.आपला गट महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणावर ठेवणे याला जनाधार म्हणत नाही. लांडग्यांनी वाघाचे कातडे पांघरले तर ते वाघ होत नाहीत. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. हे मधे शिंदे मिंधे जे आले आहेत त्यांना भाजपाने आणले आहे. हे महाराष्ट्राविरोधातले कारस्थान आहे. शिवसेना फोडणे हे मोगलांनंतरचे महाराष्ट्रावरचे सगळ्यात मोठे आक्रमण होते, हे आक्रमण मोदी शहांनी केले आहे, असा जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

“जिथे ठाकरे तिथे शिवसेना. हे शिंदे मधेच कुठून उगवले? यांना भाजपने आणलं, हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज्यात पैशाच्या ताकदीवर पाच सहा जागा जिंकल्या म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही. असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तोच सर्वात मोठा पक्ष आहे,” असेही संजय राऊत यांनी सांगितले.