गारगोटी (प्रतिनिधी) : भदरगड तालुक्यातील गारगोटीमध्ये भटक्या मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. काल (शनिवारी) रात्री ९ वा. आकुर्डे येथील ग्रामपंचायत सदस्य अशोक तुकाराम पोवार हे आकुर्डेहून गारगोटीकडे जात होते. त्याचवेळी मोकाट श्वानांनी त्यांच्या मोटरसायकलचा पाठलाग करुन यांच्या पायाचा चावा घेतला. त्यामुळे त्यांना रात्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गारगोटीमध्ये या भटक्या श्वानांचा येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वच नागरिकांना त्रास होत आहे.

या भटक्या श्वानांचा वावर स्मशानभूमी परिसरात आणि पलीकडे गारगोटी पाटगाव रस्त्यावर वेशीपासून पूलापर्यंत मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय हे श्वान हिंस्रक बनल्यामुळे दिवसेंदिवस नागरिक आणि लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक बनत चालले आहे. म्हणून संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरीत या मोकाट बेवारस श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.