मुंबई (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवणुकांचं रणांगण सुरु आहे. येत्या २० नोहेंबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर सध्या अनेक राजकीय नेते आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करत आहेत. अश्यातच आता, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून शिंदेच्या शिवसेनेने डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत होणार आहे.
लोकसभेत मुख्यमंत्री सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जिंकून आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेंसाठी सभाही घेतली होती. मात्र, असे असूनही कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिल्याने हीच का परतफेड? अशी चर्चा राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर मतदान विभागली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे विद्यमान आ. राजू पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार माजी आ. सुभाष भोईर अशी लढत होती. मात्र शिंदे गटानेही आता या मतदारसंघात आपला उमेदवार दिल्याने मनसे सैनिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात असलेले शिंदेच्या सेनेचे आ. बालाजी किणीकर यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसून अंबरनाथमधील मनसेचे पदाधिकारी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
कल्याण मध्ये शिवसेनेनं उमेदवार जाहीर केल्यानं मनसे कार्यकर्ते आता महायुतीला पाठिंबा देणार की त्यांच्या विरोधात जातील हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे.