कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसवतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी या राष्ट्रीय नेत्यासमवेत महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यावर स्टार प्रचारक म्हणून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणुक तसेच लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत राज्यभरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी कॉंग्रेसच्यावतीने महासचिव खासदार कुमार सेल्जा यानी सोमवार 29 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला सादर केली.

मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी,राहुल गांधी, प्रियांक गांधी, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, सिद्धरामय्या, भूपेश बघेल, रेवंथ रेड्डी, डी. के. शिवकुमार, सचिन पायलट, कन्हैया कुमार, इमरान प्रतापगढी, जिग्नेश मेवाणी हे महाराष्ट्रातील कॉंग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेधाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे स्टार प्रचारक असतील. अमित देशमुख, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम या तरुण नेत्यावरही प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.