कुर्डू (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कुर्डू येथील देवबा शंकर पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या परिसरात गेलेले मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या नियोजित दौऱ्याचा मार्गच बदलला. आणि मंत्री मुश्रीफ पाटील कुटुंबीयांच्या घरी पोहचले. त्यामुळे हे सर्व कुटुंबिय भारावून गेले.
याबाबत अधिक माहिती अशी, मंत्री मुश्रीफ आणि गोकुळचे संचालक युवराज पाटील हे इस्पुर्ली, कुर्डूमार्गे शिरोली-माळ्याची येथे गेले होते. तिथून पुढे ते कोल्हापूरला जाणार होते. गावातूनच मुश्रीफ पुढे गेल्याचे समजल्यावर पाटील यांनी मुश्रीफांना फोन करून परत येताना कुर्डूमार्गे येण्याचा आग्रह केला. यावेळी हसन मुश्रीफ यांनी आपण हळदीवरून वाशीमार्गे पुढे कोल्हापूरला जाणार असल्याचे समजावून सांगितले.
परंतु, देवबाचा हट्ट काही सुटत नव्हता. शेवटी एका कार्यकर्त्याच्या अंतकरणापासून केलेल्या आग्रहास्तव मंत्री मुश्रीफ कुर्डू येथे गेले आणि देवबाच्या घरी चहापान केले. अचानकच मंत्री मुश्रीफ यांच्या गाड्यांचा ताफा पाहून आजूबाजूचे ग्रामस्थही मोठ्या संख्येने जमा झाले.
यावेळी देवबा पाटील मंत्री श्री. मुश्रीफ यांना म्हणाला, साहेब, माझ्या घरी तुमचे पाय लागले. मी धन्य झालो. यावेळी मुश्रीफ म्हणाले, देवबा, कार्यकर्त्याचे स्थान हे पायाजवळ नसते. ते माझ्या हृदयात असते. यावेळी देवबाच्या डोळ्यात आश्रू तरळल्याचे पाहून सर्व ग्रामस्थ भावूक झाले.