कोल्हापूर(प्रतिनिधी): गोकुळच्या मायक्रोट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन माळी डेअरी फार्म, माणकापूर ता. चिक्कोडी येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या शुभ हस्ते, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.23/08/2024रोजी करण्यात आले.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने दूध उत्पादकांना किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी जनावरांची योग्य पैदास, आहार व व्यवस्थापन याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने दूध उत्पादक संस्थेमार्फत पुरुष व स्त्रिया (सपत्नीक) यांना एकत्रित एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यासाठी गोकुळमार्फत मायक्रो ट्रेनिंग सेंटर चालू केली आहे. अशा पद्धतीचे मायक्रो ट्रेनिंग सेंटर सुरु करण्याची मागणी शिरोळ, हातकणंगले व सीमा भागातील दूध उत्पादकांनी केली होती. त्यानुसार संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये प्रफुल्ल माळी यांच्या माळी डेअरी फार्म, माणकापूर ता. चिक्कोडी येथे नवीन मायक्रो ट्रेनिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन मायक्रो ट्रेनिंग सेंटरमुळे शिरोळ, हातकणंगले व सीमा भागातील दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येतील. या प्रशिक्षणासाठी संघामार्फत अनुदान देण्यात येत असून जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी हे प्रशिक्षण घेऊन किफायतशीर दुग्ध व्यवसाय करावा असे आवाहन केले.
यावेळी बोलताना संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन गुणवत्तापूर्ण दूध संघास पाठवावे, गोकुळ निश्चितच दूध उत्पादकांना त्यांच्या कष्टाचा मोबदला देईल असे आश्वासन दिले.
यावेळी माळी डेअरी फार्मचे प्रफुल्ल राजेंद्र माळी म्हणाले की, मी गोकुळ दूध संघाचा दूध उत्पादक असून भैरवनाथ संस्थेच्या माध्यमातून गाय, म्हैस प्रतिदिन 500लिटर दूध संघास पुरवठा करीत आहे. गोकुळच्या वासरू संगोपन योजना व विविध सेवासुविधा तसेच मार्गदर्शन घेऊन उत्तम व्यवस्थापनाद्वारे हा डेअरी फार्म उभा केला असून सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. याचा फायदा नवीन दूध उत्पादकांना नक्कीच होईल असे मनोगत व्यक्त केले.
या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, माळी डेअरी फार्मचे प्रफुल्ल माळी, गोकुळचे संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, डॉ.प्रकाश दळवी, विजय मगरे, डॉ.राजू माने (सांगाव), लता उत्तम रेडेकर, कॅनरा बँकचे अधिकारी तसेच रांगोळी, इचलकरंजी या गावातील दूध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.