छत्रपती सांभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात होत असलेली दिरंगाई या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जरांगे फॅक्टर महागात पडला. 44 प्लसचा नर देणाऱ्या महायुतील 17 जागांवर मजल मारता आली. तर मराठवाड्यातील जवळपास सगळ्याच मतदारसंघांमध्ये मराठा मतदान निर्णायक ठरलं. मराठवाड्यातील आठपैकी सात मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा महायुतीला मिळाली. दरम्यान, सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. खुद्द जरांगे यांनी मध्यमाशी बोलताना ही घोषणा केली आहे. मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही. वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असंही जरांगेंनी सांगितलंय.

मराठ्यांना आरक्षण द्या. वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत देण्यात आलेला शब्द पाळा. तिथे उधळण्यात आलेल्या गुलालाचा मान राखा. अन्यथा गुलाल तुमच्यावर रुसेल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. आम्हाला आचारसंहितेचं कारण सांगू नका. आमचा प्रश्न सोडवा. अन्यथा आम्हाला राजकारणात उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा सूचक इशारा पाटलांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी समाजातील सर्वसामान्य उमेदवार देऊन राजकारणात उतरण्याची चाचपणी केली होती. पण त्यावेळी त्यांच्याकडे वेळ कमी होता. आता विधानसभेला तीन ते चार महिन्यांचा अवधी शिल्लक असल्यानं त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी १०० मतदारसंघांमध्ये जरांगे पाटील चाचपणी करत आहेत. यातील बहुतांश जागा मराठवाड्यातील आहे.

छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिवमधील विधानसभा मतदारसंघांची चाचपणी करण्यात आलेली आहे. संभाजीनगरातील वैजापूर, गंगापूर, कन्नड, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, जालन्यातील बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, बीडमधील बीड, गेवराई, शिरुर, आष्टी, माजलगाव, धाराशिवमधील धाराशिव, भूम, परंड्यात जरांगे समर्थकांकडून चाचपणी करण्यात आली आहे.