मुंबई : लोकसभा निवडणुका संपताचं महाविकास आघाडीत आता विधापरिषदेतील जागावाटपावरून जुंपली आहे. ठाकरे गटाकडून परस्पर 4 जागा जाहीर केल्यामुळे नाना पटोलेंनी आज पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त करत अजूनही वेळ गेली नसल्याचं म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा परस्पर उमेदवार घोषित केल्यामुळे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला संतप्त झाले आहेत.

राज्यात विधानपरिषद आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाने मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात शिक्षक, पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर केली आहे. 26 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी छाननीनंतर 88 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता लोकसभेत वरचढ ठरल्यानंतर महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा पराभव करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र प्रयत्न करताना दिसेल असे वाटत होते. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या निर्णयाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान दोन जागा ठाकरे गटाला आणि दोन जागा काँग्रेसकचा प्रस्ताव असताना शिवसेना ठाकरे गटाने चार जागांचे उमेदवार जाहीर केल्याने महाविकस आघाडीत वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

उद्धव ठाकरेंनी आधी दोन जागा जाहीर केल्या होत्या. मात्र आमची कोकण आणि नाशिकमध्ये तयारी आहे असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यावर बसून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईत आम्ही अजून अर्ज केलेला नाही, त्यामुळे अजूनही वेळ गेली नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मी स्वतः मातोश्रीवर सकाळपासून फोन लावला होता. पण अजून संपर्क झालेला नाही. आमचे खासदार भेटायला जातात ‌त्यात गैर नाही. जागावाटप हा वेगळा मुद्दा आहे. आमची भूमिका जुळवून घ्यायची आहे. आम्ही अजूनही एकजुटीनं लढत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला नाराज
लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. याच फटका महाविकास आघाडीला बसला. काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवणारे विशाल पाटील हे निवडणूक जिंकले. यानंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीत नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे.

ठाकरे गटाने विधान परिषद निवडणुकीसाठी चारही जागांवर उमेदवार घोषित केल्यामुळे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ठाकरे गटाने उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करायला हवी होती, असे काँग्रेसचे मत आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, लोकसभा जागावाटपाप्रमाणे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा परस्पर उमेदवार घोषित केल्यामुळे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत.