मुंबई : विधानसभेत बुधवारी (ता. 10 जुलै) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी (ता. 09 जुलै) विरोधकांनी मराठा आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवली. ज्यामुळे सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना घेरले. यावेळी भाजप आमदार अमित साटम यांनी विरोधकांना मराठा आरक्षणाचे काही पडले नाही. त्यांना त्यांचे राजकारण करायचे आहे, असा आरोप करत विधानसभेचे वातावरण तापवले. यानंतर गोंधळ निर्माण झाला. यामुळे विधानसभेतील कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

भाजप आमदार अमित साटम यांनी विधानसभेत मराठा आरक्षणासाठी आयोजित केलेल्या सर्व पक्षीय बैठकीचा मुद्दा उपस्थित केला. या बैठकीला विरोधक का आले नाहीत, असा प्रश्न त्यांनी केला. विरोधकांना मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे काही पडले नाही असा आरोप साटम यांनी केला. शिवाय ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहीजे की नाही याबाबत विरोधकांची भूमीका काय असा प्रश्न करत त्यांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधानसभेत गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी यावेळी बोलण्याचा प्रयत्न केला पण गदारोळ वाढला आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

बैठकीला जाण्यापासून रोखणारं कोण?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांना लक्ष केले. यावेळी ते म्हणाले की, मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. अगोदर विरोधकांनी सांगितले येणार. आम्ही तुमच्याबरोबर येऊ चर्चा करू म्हणाले. मग ऐनवेळी असा कोणाचा निरोप येतो? कोणाचा फोन येतो? कोणाचा मेसेज येतो? दुपारपर्यंत येतो येतो म्हणणारे, अचानक असा कोण यांचा बोलविता धनी आहे? यांचा सभागृहाच्या बाहेर कोणीतरी बोलविता धनी आहे, जो सांगतो की बैठकीला तुम्ही जाऊ नका. मनोज जरांगेंच्या भूमिकेला तुमचं समर्थन असेल, तर तुम्ही बैठकीला का आला नाहीत? विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी, असे शेलारांकडून यावेळी सांगण्यात आले.

तसेच, विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे. ते मंगळवारी झालेल्या बैठकीला का नाही आले? याचे कारण त्यांनी सांगितले पाहिजे. कारण त्यांनी या बैठकीला न येऊन समाजाचा अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे. या सदनाकडून आणि सभागृहाकडून समाजाच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे सर्वजण एकत्र चर्चा करून या मुद्द्यावर तोडगा काढू शकतात. हे दरवेळी सर्वपक्षीय बैठकीची मागणी करतात पण मग त्यांनी काल प्रत्यक्ष बैठकीतून पळ का काढला? असा प्रश्न आशिष शेलार यांच्याकडून यावेळी विरोधकांना विचारण्यात आला.

विजय वडेट्टीवारांचा पलटवार
विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आरोपाच्या फैरी झडत होत्या. त्यावेळी विरोधकांकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चा सांभाळला. सत्ताधारी स्वत:चे पाप लपवण्यासाठी हा गोंधळ करत असल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार पलटवार केला. राज्यात जो मराठा विरूद्ध ओबीसी हा वाद पेटवला जात आहे त्या पापात सर्वात मोठा वाटा महायुतीचाच असल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी एकच खळबळ उडवून दिली. मराठा विरुद्ध ओबीसी वाद महायुतीने निर्माण केला. पाणी नाकात घुसायला लागल्यावर यांना आता बैठकीची आठवण सत्ताधाऱ्यांना झाली असा आरोपही त्यांनी केला.त्यानंतर सभागृहात गोंधळ आणखीन वाढला. अध्यक्षांनी सर्वांना शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र गोंधळ काही कमी झाला नाही. शेवटी सभागृहाचे कामकाज अध्यक्षांना दुसऱ्यांदा तहकूब करावे लागले.

विखेंची शरद पवारांवर टिका
राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होवूनही त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता आला नाही, असा आरोप करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लक्ष्य केलेदेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे मराठा समाजाने आणि जरांगेंनी ओळखावे. त्यांना आता गाव बंदी करावी असेही विखे यावेळी म्हणाले. लोकसभेत मिळालेल्या फसव्या यशामुळे विरोधक आंधळे झाले आहेत. लोकांना झुलवत ठेवणे हे विरोधकांचे काम आहे. पण आता ते शक्य नाही असे म्हणत त्यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला.