कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनेक घडामोडीनंतर काँग्रेसचं अखेर ठरलं असून उमेदवार म्हणून मधुरिमाराजेचं याचंच नाव फायनल झालं आहे. याबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरी उद्या सकाळी थेट ही घोषणा होवून थेट अर्ज भरण्याची कार्यवाही होणार आहे. काही वेळापूर्वी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत याला दुजोरा दिल्याचे समजते.
काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदार संघातून राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणावर असंतोषाचा उद्रेक झाला होता. त्याची दखल घेणे अखेर काँग्रेस श्रेष्ठींना भाग पडले. दिवसभर नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आणि त्याचीच परिणीती आज सायंकाळी उमेदवार बदलण्यात झाली.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्या ऐवजी मधुरिमाराजे यांना कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली.मधुरिमा राजे या माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी आणि काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या सुनबाई आहेत. तर दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत.
कोल्हापूर शहरात क्रीडा, सांस्कृतिक ,सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात मधुरिमाराजे या सक्रिय आहेत. त्यांचा आता महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी सामना होईल. ही लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.