पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा नगरपरिषदेच्या नगरसेविका माधवी भोसले यांची भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपा प्रवक्ते माजी खा. धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.  यावेळी भाजपा युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्‍यक्ष विक्रांत पाटील उपस्थित होते.

विक्रांत पाटील म्हणाले की, अखंड महाराष्ट्रातील जनतेला आणि खासकरून तरुणाईला न्याय मिळवून देणारा आणि त्यांचे भविष्य उज्वल बनवणारा हा युवा मोर्चा आहे. भाजपा युवा मोर्चामध्ये काम करणाऱ्यांना राजकारण आणि समाजकारण यामध्ये नेहमीच चांगली संधी मिळते. त्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे काम करत रहावे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव आणि प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते नगरसेविका सौ. माधवी अमरसिंह भोसले यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी सन्माननीय निवड झाल्याचे अधिकृत पत्र यावेळी देण्यात आले. या निवडीनंतर अनेक मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई, जिल्हा संघटन मंत्री शिवाजी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, नंदू मोरे मान्यवर उपस्थित होते.