कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांची आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. रविवारी घरात पाय घसरून पडल्यानं त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती. यानंतर कोल्हापुरातील ऍस्टर आधार रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. मात्र, ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. गेले दोन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पी. एन. पाटील निधनानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली होती त्यानंतर हॉस्पिटलच्या वतीने त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराबाबत आणि प्रकृती बाबत माहिती दिली होती. त्यावेळी डॉक्टरने उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले होते. जिल्ह्यातील काही तज्ञ डॉक्टर तसेच मुंबईहून खास विमानाने आलेला काही तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. जिल्ह्यातील आणि करवीर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्यांना जीवदान मिळावे यासाठी देवाकडे साखड सुद्धा घातले होते. पण सर्व प्रयत्न निष्प ठरले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा दुःखाची छाया पसरली आहे. आमदार पी एन पाटील यांचे पार्थिव सकाळी दहा वाजता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आवारात दर्शनासाठी आणण्यात येणार असून या ठिकाणी दर्शनानंतर त्यांचे मूळ गाव असलेल्या सोडवली खालसा या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी. एन. पाटील यांची राज्यात ओळख आहे. गेल्या 40 वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात आपली वेगळी प्रतिमा तयार करत ते करवीर विधानसभा मतदारसंघातून 2004 आणि 2019 असे 2 वेळा आमदार झाले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे.