कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हास्तरीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या योजनांबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 या कालावधीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कावळा नाका येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या तक्रारी लोकशाही दिनामध्ये सादर कराव्यात, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
प्रशासन अधिक लोकाभिमुख करणे, त्यात निर्णय क्षमता आणणे आणि सर्वांच्या सहाकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याबाबत, पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख प्रशासन नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी कार्यालयीन गतिमानता अभियान राबविण्याच्या अनुषंगाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम राबविण्यात येत असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन साळे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.