धामोड (सतीश जाधव) : राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी रातांबीचा धनगरवाडा, मधला धनगरवाडा, येडगे धनगरवाडा आणि पादुकाचा धनगरवाडा हे धनगरवाडे देश स्वतंत्र होवून पंचाहत्तर वर्षे पूर्ण व्हायला आली तरी आजून विकास कामापासून दुर्लक्षीत आहेत. येथे मुख्य रस्त्यावर येण्यासाठी येथील नागरिकांना पाच ते सात किलोमीटरची पायपीट करावी लागते. या अडथळ्यांमुळे येथील जनतेने अनेक निष्पाप जीव गमावले आहेत. असे वृत्त सर्व प्रथम ‘लाईव्ह मराठी’ने प्रसारीत केले होते.

19 ऑगस्ट रोजी रात्री सुनील गंगाराम घुरके या मुलाचा सर्पदंशाने आणि 19 नोव्हेंबरला भागुबाई घुरके या गरोदर महिलेचा बाजल्यावरुन दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. या महिलेला रस्ता नसल्यामुळे वेळेवर दवाखान्यात नेता आले नव्हते. तसेच सुनील घुरके याला सुद्धा रस्ता नसल्यामुळे दवाखान्यात नेताना मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनेची ‘म्हासुर्लीचे धनगरवाडे आणखीन किती जीव गमावणार’ असे वृत्त प्रसारीत करीत ‘लाईव्ह मराठी’ने आवाज उठवला होता.

या बातमीची दखल घेत शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष प्रा. जालंदर पाटील आणि धनगर समाजाचे कोल्हापूर जिल्हा संघटक धोंडीराम मलगुंडे यांनी यामध्ये जातीने लक्ष घातले. त्यांनी सांगितले की, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लेखाशिर्षक ३०५४ अंतर्गत मानेवाडी ते पादुकाचा धनगरवाडा या पाच किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी दिलेली आहे. लवकरच या कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी या वृत्ताबद्दल ‘लाईव्ह मराठी’चे आभारही मानले.