मुंबई : विधान परिषद निवडणूक शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत पुढे ढकलण्यात आली होती. या चार मतदारसंघांतील निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. यात दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश असून, दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करत ठाकरेंनी निवडणुकीत आघाडी घेतली आहे. शिवसेनेने अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे.
अनिल परबांचे विधान परिषद सदस्यत्व २७ जुलै रोजी संपत आहे. विलास पोतनिस यांचे तिकीट कापण्यात आले आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष असलेले ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून सध्या कपिल पाटील आमदार आहेत. आता भाजपा इथे कोणाला उतरविते याकडे पाहणे गरजेचे आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ या चार मतदारसंघात निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, २६ जून रोजी मतदान होणार असून, निकाल म्हणजे मतमोजणी १ जुलै २०२४ रोजी केली जाणार आहे.




