श्रीहरीकोटा : स्पेस डॉकिंग एक्सप्रिमेंट या अवकाशात दोन उपग्रहांना जोडणाऱ्या मोहिमेचे आज रात्री नऊ वाजून 58 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे. इस्रोतर्फे चांद्रयान 4 आणि भारतीय अवकाश स्थानकाची पूर्वतयारी म्हणून स्पेडेक्स हा प्रयोग केला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अवकाशात दोन भागांची जोडणी करण्याची (डॉकिंग) क्षमता असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरेल.

पीएसएलव्ही सी 60 च्या साह्याने प्रत्येकी 220 किलो वजनाच्या एसडीक्स 1 आणि एसडीक्स 2 या दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येईल. जमिनीपासून 470 किमी उंचीवरील वर्तुळाकार कक्षेत दोन्ही उपग्रहांना लहानशा गती फरकाने मुक्त केले जाईल. साधारणपणे 24 तासांमध्ये दोन्ही उपग्रहांमधील अंतर 10 ते 20 किलोमीटर इतके होईल. उपग्रहांवरील इंजिनाच्या साह्याने दोन्ही उपग्रहांना एका समान कक्षेत आणून त्यांचा वेगही समान केला जाईल.

दोन उपग्रहांमधील अंतर 20 किलोमीटर असताना प्रयोगाची सुरुवात होईल. एसडीक्स 02 या लक्ष्य उपग्रहाच्या दिशेने एसडीक्स 01 हा उपग्रह पाठलाग सुरू करेल. टप्प्या- टप्प्याने दोन्ही उपग्रहांमधील अंतर कमी होत जाईल. उपग्रहांचे डॉकिंग अचूकतेने घडावे यासाठी लेझरचा समावेश असलेले पाच वेगवेगळे सेन्सर वापरण्यात येणार असून, उपग्रहांच्या कक्षेतील स्थान निश्चितीसाठी जीएनएसएस उपग्रहांची मदत घेतली जाईल. उपग्रहांचे डॉकिंग पूर्ण झाल्यानंतर एका उपग्रहाकडून दुसऱ्या उपग्रहाकडे वीज प्रवाह सक्रिय करण्याचाही प्रयोग करण्यात येईल. दोन्ही उपग्रहांना काही काळाने विलगही करण्यात येईल.

2028 ते 2035 या कालावधीमध्ये भारतीय अंतरिक्ष स्टेशनची निर्मितीही टप्प्या टप्प्याने डॉकिंगद्वारे केली जाणार असून, भारतीय यानांनी अवकाश स्थानकाला भेट देण्यासाठीही ही प्रक्रिया अत्यावश्यक असेल. 2040 मध्ये चांद्रभूमीवर भारतीय नागरिक पाठवतानाही डॉकिंगचा वापर केला जाईल. या तंत्रज्ञानाची पहिली चाचणी स्पेडेक्स मोहिमेतून घेतली जाईल.