कळे ( प्रतिनिधी ) : जोतिबाची यात्रा झाली की ग्रामीण भागात यात्रा सुरु होतात. अनेक गावात यात्रेनिमित्त गाडा किंवा  पालखीच्या समोर डॉल्बी लावण्यासाठी तरुण मंडळामध्ये कमालीची ईर्षा पाहायला मिळत आहे.  डॉल्बीच्या कर्कश आवाजबरोबर आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या लेझर लाईटमुळे पोहाळे तर्फे बोरगाव येथील हर्षद निवास पाटील या बावीस वर्षीय तरुणाच्या डोळ्याला गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे त्याला एका डोळ्याने दिसायचे बंद झाल्याने उपचारासाठी त्याला कोल्हपुरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. 

डोळ्यांसाठी अत्यंत घातक ठरलेल्या लेझर लाईटमुळे यापूर्वी देखील अनेक वाईट घटना घडल्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षात याचा वापर मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत वाढला आहे. पोहाळे तर्फ बोरगाव येथील बावीस वर्षीय हर्षद पाटील हा पालखीची मिरवणूक बघायला गेला होता यावेळी लेझर लाईट त्याच्या डोळ्यामध्ये गेल्याने त्याची नजर कमजोर झाली असून याला अचानक दिसायचं बंद झालं आहे. त्याला एका डोळ्याने दिसणे बंद झाले आहे. डोळ्यातील पडदा तपासला असता यावेळी डोळ्याचा सूक्ष्म भाग असलेला मॅक्युलम मध्ये लेझर किरण गेल्याने रक्तवाहिनी फुटली होती यामुळे रक्तस्राव झाला असल्याचे डॉक्टरानी सांगितले आहे. 

लेसरकिरणांची तीव्रता अधिक असल्यामुळे नागरिकांनी अशा मिरवणुका टाळणे किंवा या किरणांकडे बघूच नये ही दक्षता घ्यायला हवी. तसेच शासनाने या धोकादायक लेसर किरणांच्या वापरावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे.