कुरुंदवाड (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची टेम्पोतून अवैध मद्याची वाहतूक करताना कुरुंदवाड पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 5 लाख 4 हजार रुपये किंमतीचे मद्य आणि टेम्पो असा एकूण 10 लाख 4 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रामा बाळा लोकरे (वय ३६, रा. जिमखाना ग्राउंड, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला पोलिसांनी अटक केलीय.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचमैल ते हेरवाड मार्गावर दोस्ती धाब्याजवळ आज (सोमवार) दुपारच्या सुमारास गोवा बनावटीची मद्य घेवून टेम्पो येत असल्याची गोपनीय माहिती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक फडणीस यांना मिळाली होती. त्यामुळे या मार्गावर पोलिसांनी दुपारपासूनच सापळा रचला होता.
यावेळी दुपारी चारच्या सुमारास टेम्पो (क्र. Mh 09 Gj 1054) येताच पोलिसांनी टेम्पो अडवून त्याची झडती घेतली. यावेळी पोलीसांना गोवा बनावटीची 5 लाख 4 हजार किंमतीचे 50 बॉक्स मद्य सापडले. या टेम्पोमध्ये मद्याची अवैध वाहतूक करण्यासाठी विशिष्ट कप्पे बनविण्यात आले होते.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सागर पवार, संतोष साबळे, सागर खाडे, पोपट ऐवळे, नितीन साबळे, सचिन पुजारी, सायबर पोलीस ठाण्याचे रविंद्र पाटील यांनी केली.