राधानगरी : बालपण दे गाय देवा… असं म्हंटल जातं. जसजसं आपण मोठं होत जातो तसं लहानपण हवसं वाटायला लागतं. पण मोबाईलच्या या दुनियेत आजची युवा पिढी बालपण हरवत चालली आहे. खेळांकडे दुर्लक्ष करत मोबाईलचा वापर वाढला आहे. मात्र राधानगरी तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल कसबा तारळे या शाळेने विद्यार्थ्यांची नाळ मातीशी घट्ट राहावी यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. तो म्हणजे चिखल महोत्सव…
आजपर्यंत आपण नाट्य महोत्सव, खाद्य महोत्सव, चित्रपट महोत्सव, पतंग महोत्सव पाहिला असेल. पण चिखल महोत्सव कधी कुणी पहिला असेल? असं वाटत नाही. पण कोल्हापूरमधील एका शाळेत चक्क चिखल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये शाळकरी मुलांनी चिखलात लोळत, उड्या मरुन या महोत्सवा आनंद घेतला.
ग्रामीण भागातील लोकांची नाळ ही मातीशी घट्ट असते. मुलांच मातीत खेळणं, बागडण सुरू असतं. याच रांगड्या मातीची मुलांना मायेची ऊब देण्यासाठी चिखल महोत्सव आयोजित करून विद्यार्थ्यांना एक वेगळीच अनुभूति दिली. विद्यार्थ्यांनीही या महोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटत मातीशी नाळ घट्ट असल्याचं दाखवून दिलं.
आधुनिक आणि धक्काधकीच्या जीवनात आपण मातीचे महत्त्वच विसरत चाललो आहोत. नवनिर्मितीची आस असणाऱ्या मातीत लहानपणी मनसोक्त खेळणारे आपण मोठेपणी मात्र मातीपासून दूर राहतो. मातीचा हवा असणार सुगंध नकोसा वाटायला लागतो. त्यामुळे याच मातीचं महत्त्व कळावं आणि मातीविषयी प्रेम कायम रहावं यासाठी तारळे हायस्कूलच्या वतिनं ‘चिखल महोत्सव’ अर्थात ‘मड फेस्टिव्हल’चं आयोजन केलं होतं.
तर चिखलात मनसोक्त खेळणाऱ्या मुलांना पाहण्यासाठी तारळे परिसरातून माजी विद्यार्थी, गावकरी उपस्थिती होते. राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसात झालेला हा आगळा वेगळा चिखल महोत्सव फक्त आनंदच नव्हे तर उपस्थितांना मायेची उब देऊन गेला. या महोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांना मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर तसेच मातीमध्ये हळद पसरण्यात आली. गोमूत्र शिंपडण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही चिखल महोत्सवाचा आनंद लुटला.