कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025 -26 प्रारूप आराखडा बाबत राज्यस्तरीय बैठक अजित पवार उपमुख्यमंत्री, वित्त नियोजन, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी अडीच वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे संपन्न झाली.

सदर बैठकी करता जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच माधुरीताई मिसाळ सह पालकमंत्री कोल्हापूर तथा राज्यमंत्री नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी अमोल एडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेअन, महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.

सन 2025-26 करिता राज्य शासनाने कोल्हापूर जिल्ह्याकरता 518 कोटीचे नियोजन दिले होते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त 422 कोटी रुपयाचा आराखडा तयार करून शासनास 940 कोटी रुपयांचा आराखडा आजच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला.

सदर बैठकीमध्ये सन 2024-25 चे 100% नीधी वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले तसेच मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार अपारंपारिक ऊर्जा योजनेमधून शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयांना सोलरवर टप्पाटप्प्याने रूपांतर करण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्याबाबत व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे तसेच मधाचे गाव पाटगाव अंतर्गत चांगल्या प्रतीच्या शुद्ध मधाचे उत्पादन वाढवून रोजगार निर्मितीस चालना देण्याबाबत वित्तमंत्री यांनी सूचना दिली.गंगावेश तालीम, रंकाळा तलावातील सांडपाणी बाबत नियोजन,मिशन शाळा कवच, समृद्ध विद्या मंदिर अंतर्गत कामाकरता जास्तीत जास्त लोकसहभाग, सीएसआर फंड यामधून विकास करण्याबाबत नियोजन करण्यात आले. कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा आणि पन्हाळा किल्ला जागतिक वारसा साठी करण्यात येणाऱ्या कामाकरता राज्यस्तरीय योजनेमध्ये प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मा. वित्तमंत्री यांनी दिल्या. आमदार राहुल आवडे यांनीही इचलकरंजी मधील इंदिरा गांधी रुग्णालय, महावितरण बाबत काही मुद्दे उपस्थित केले.

सदर बैठकीमध्ये वित्तमंत्री यांनी कोल्हापूर जिल्ह्याने सादर केलेल्या आराखड्या बाबत तसेच यापूर्वी केलेल्या नाविन्यपूर्ण व इतर योजनातील कामाबाबत गौरव उदगार काढले व या आराखड्या बाबत सकारात्मक मत प्रदर्शित करून येणाऱ्या आर्थिक वर्षात सदर आरखड्यास आवश्यक निधी दिला जाईल असे सांगितले.