संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना चार टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बँकेत कार्यरत असलेल्या कोडीको बँक एम्प्लॉईज युनियन, बँक एम्प्लॉईज युनियन या दोन्हीही युनियन व बँक व्यवस्थापनामध्ये याबाबत 5 ऑगस्टला करार केला जाणार आहे. 1 एप्रिल 2017 पासूनचा 36 कोटी फरकही कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.
जिल्हा बँक कर्मचारी व बँक व्यवस्थापनामध्ये 2007 मध्ये पगारवाढीचा करार झाला होता. त्याची मुदत मार्च पर्यंत होती. मात्र, बँकेवर 2009 ला प्रशासकीय मंडळ आल्याने पुन्हा करारच होऊ शकला नाही. मे 2015 मध्ये बँकेचे संचालक मंडळ कार्यरत झाले. मात्र, बँकेला संचित तोटा असल्याने पगारवाढीचा निर्णय झाला नाही. बँक 2017 ला नफ्यात आल्यानंतर युनियनने पगारवाढीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यातून 2004 व 2018 मध्ये कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक-एक इन्क्रिमेंट, पाच टक्के पगारवाढ व मागील फरक आदी मागण्या युनियनने केल्या होत्या. गेल्या वर्षभरात बँक व्यवस्थापन व युनियनमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. यातून चार टक्के पगारवाढ, सात वर्षांचा फरक आदी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. फरकापोटी बँकेने मार्च 2024 च्या ताळेबंदाला 15 कोटींची तरतूद करून ठेवली आहे. परंतु; एकरक्कमी पगार फरक देण्याची मागणी युनियनची आहे.
वर्षाला 37 कोटींचा अतिरिक्त बोजा…..!
पगारवाढीच्या निर्णयाने जिल्हा बँकेला वार्षिक 37कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मुळात बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे ताळेबंदावर फारसा ताण पडेल, अशी सध्या तरी स्थिती नाही.
सेवानिवृत्तांनाही महिन्याला 100 रुपये…..!
एप्रिल 2011 ते 31 मार्च 2017 अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी कोणत्याही पगारवाढ मिळाली नाही. त्यांच्यासाठी युनियनने महिन्याला 200 रुपयांची मागणी केली होती, संचालक मंडळाने 100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 71 महिन्यांचे प्रत्येक 7100 रुपये मिळणार आहेत.
असे झालेत निर्णय…!
१. एक एप्रिल 2017 पासून चार टक्के पगारवाढ
२. सात वर्षांचा 36 कोटी फरकही मिळणार
३. सेवानिवृत्तांना 71 महिन्यांचे 7100 रुपये मिळणार
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, राजेश पाटील, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी आय. बी. मुन्शी, दिलीप लोखंडे आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे, अधिकारी उपस्थित होते.