भिवंडी ( प्रतिनिधी ) – भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांना पोलिसांना शिवीगाळ करणे महागात पडलं आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी पार पडलं. मुंबईतील सहा जागांसह भिवंडी, ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर, धुळे, नाशिक, दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि अधिकारी पोलिसांना शिवीगाळ केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल पाटील यांच्यासह 4 जणांविरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे.

भिवंडीतील अन्सारी मैदान परिसरातील एका शाळेत बोगस मतदान होत असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर कपिल पाटील तिथं पोहोचले होते. यावेळी त्यांनी अधिकारी आणि पोलिसांना दमदाटी आणि शिवीगाळ केली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला होता. शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर टीका करण्यात आली होती. सरकारी कामात अडथळा तसेच अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील सह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, दादा गोसावी, भाजपचा भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटील आणि रवी सावंत या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह 4 जणांविरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे. भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे