मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट (एनसीपीए) निर्मित दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित कलगीतुरा या संगीत नाटकाची नवी दिल्लीतील एनएसडीच्या २४ व्या भारतीय रंग महोत्सवात निवड झाली आहे. नवी दिल्लीत दरवर्षी होणारा वंदे भारंगम हा रंगभूमीसाठी मानाचा महोत्सव समजला जातो. हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक यानंतर सलग तिसरे मराठी नाटक भारंगमसाठी निवडले गेल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

९ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीतील श्रीराम सेंटर येथे सायंकाळी ५ वाजता कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण होणाराय. अनेक पुरस्कारांनी नावाजलेले हे नाटक नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या मानाच्या इंडियन हॅबीटंट सेंटरच्या राष्ट्रीय महोत्सवात सादर झाले होते.

 नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथील कलगीतुरा परंपरेचा अभ्यास करून दत्ता पाटील यांनी ही संहिता लिहिली आहे. तब्बल २२ कलावंतांचा समावेश असलेले हे लोकसंगीतमय समकालिन भाष्य करणारे नाटक सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केले आहे.