बेटाच्या स्वरूपातून परिसराची मुक्तता, वाहतूक व जनजीवन सुस्थितीत

कळे (प्रतिनिधी : सचिन सुतार ) – धामणीखोरा परिसराचे प्रवेशद्वार असणाऱ्या कुंभी नदीवरील कळे-सावर्डे ( ता.पन्हाळा ) या धरणाला समांतर भव्य पुलाची उभारणी झाली असल्याने धामणी खोऱ्यातील जनतेची पावसाळयात होणारी गैरसोय थांबली असून बेटाच्या स्वरूपातून मुक्तता मिळाली आहे. त्यामुळे धामणीखोऱ्यासाठी कळे-मल्हारपेठ-सावर्डे पूल वरदान ठरत आहे.

धामणीखोऱ्यात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कुंभी-धामणी नदीचे पाणी पात्राबाहेर जाऊन नदीला पूर येत असल्याने कळे-सावर्डे धरण पाण्याखाली जात होते. त्यामुळे सुमारे 45 गावांतील जनतेसाठी वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत होती. रुग्ण, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत होती. अतिप्रसंगावेळी नागरिकांना होडीच्या साहाय्याने नदीपलीकडील गावातील पै-पाहुण्यांचा आधार घ्यावा लागत होता.

शेतकऱ्यांना पाणी मिळावे या उद्देशाने सहकारी तत्त्वावर सन. 1955 -56 साली. बांधलेल्या कळे-सावर्डे धरणावरुन धामणी परिसरातील रहदारी सुरू होती. पावसाळयात दमदार पावसामुळे हे धरण महिनाभर पाण्याखालीच राहत असल्याने सुमारे 45 गावांतील वाहतूक ठप्प होत होती. परिसराला बेटाचे स्वरुप येत होते. त्यामुळे कळे-सावर्डे धरणाला समांतर पूल उभारावा, अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली होती.

तक्तालीन आम.डॉ.विनय कोरे यांनी साडेपाच कोटींचा निधी मंजूर करून सन 2009 मध्ये पुलाच्या कामास सुरुवात केली. निधीअभावी बांधकाम काही महिने थांबले असताना उर्वरित कामांसाठी आम.चंद्रदीप नरके यांनी निधी मंजूर केला. दोन्ही आमदारांच्या पाठपुरावा व प्रयत्नामुळे सन 2012 मध्ये भव्य पुलाची उभारणी होऊन पूल वाहतुकीस खुला झाला. 

कोल्हापूर-गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाला कळे-म्हासुर्ली, कळे-गारीवडे-गगनबावडा, हा मार्ग जोडला गेल्याने या पूला वरून अवजड वाहनासह बारमाही वाहतूक सुरू झाली असून पुलाने महत्वपूर्ण भूमिका बजावत वाहतूक आणि जनजीवन ही सुस्थितीत ठेवले. त्यामुळे हा पूल धामणीखोऱ्यासाठी वरदान ठरत आहे.