कळे ( प्रतिनिधी ) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील सांडपाणी व्यवस्थापनासाठी देवस्थान समितीच्या मालकीच्या गायरान जमिनीतील काही क्षेत्र मिळावे आणि बंद असलेले नैसर्गिक ओढे-नाले खुले करण्याची मागणी कळे-खेरीवडे ग्रामपंचायतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
कळेतील सांडपाणी थेट कुंभी नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषण होऊन ग्रामस्थांसह आजूबाजूच्या गावांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेजारील मल्हारपेठसह परिसरातील गावात गतआठवड्यात अतिसाराची साथ आली होती. याबाबत मल्हारपेठ ग्रामपंचायतीने कळे-खेरीवडे ग्रामपंचायतीला लेखी कळविले होते. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सांडपाणी नदीत मिसळू नये म्हणून जिल्हा समन्वयक माधुरी परीट यांनी ग्रामपंचायतीला सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हद्दीत जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी मारुती देवालयाची देवस्थान समितीच्या मालकीची गायरान गट क्रमांक 71 मधील एकूण क्षेत्रातील 15 गुंठे इतके क्षेत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी यांच्याकडील ‘ना हरकत दाखला’ मिळावा अशी मागणी पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीने केली आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सरपंच सुभाष पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केली आहे. तसेच सांडपाणी निर्गतीसाठी असलेले नैसर्गिक ओढे-नाले लोकांनी बंद केले आहेत. ते खुले करण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.