कागल (प्रतिनिधी) : कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. आजवरचे आयुष्य जनतेची इमाने – इतबारे सेवा करण्यातच खर्ची घातले. उर्वरित आयुष्यातही जनतेचे हे पांग फेडण्याची शक्ती मला गोमातेने द्यावी, अशी प्रार्थना वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
कागल येथील श्री गहिनीनाथ गैबी चौकात वसुबारसच्या निमित्ताने गोमातेची पूजा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेली 40 वर्ष अव्याहतपणे सामाजिक जीवनात कार्यरत आहे. या काळात सहा वेळा विधानसभा निवडणूक लढविली. त्यापैकी जनतेने मला सलग 5 वेळा निवडून दिले. त्यामुळेच मला 25 वर्षे आमदार आणि त्यापैकी 19 वर्ष मंत्रिपदाचा बहुमान मिळाला. जनतेचे हे ऋण या जन्मीच काय, तर पुढच्या सात जन्मातही फेडू शकत नाही.
जनतेचा हा पांग फेडण्याच्या कृतज्ञतेच्या भावनेतूनच रुग्णसेवा, निराधारांची सेवा, विकासकामे, बांधकाम कामगारांचे कल्याण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माता -भगिनींना दिलासा,आरोग्यसेवेच्या माध्यमातून मी माझे आयुष्य खर्ची घातले असल्याचंही मंत्री मुश्रीफ म्हणाले.
यावेळी पत्रकार अतुल जोशी, भैय्या माने, समीर घाटगे, नितीन दिंडे, आदी प्रमुख उपस्थित होते.