कळे (प्रतिनिधी) : आजकाल चांगल्या माणसांना राजकारण मारक आहे. पत्रकाराने त्यांना जगवले पाहिजे तरच ते बदल घडवू शकतात. प्रतिमांच्या मेकअपचे थर खरवडून खरा चेहरा लोकांच्या पुढे आणण्याचे काम पत्रकार करत असतो.असे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. ते पन्हाळा तालुक्यातील कळे येथे पत्रकार दिनानिमित्त पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी कळेचे सरपंच सुभाष पाटील होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २१ मान्यवरांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आ. खोत यांनी, अलीकडच्या काळात आमदारकीचा दर बघितला तर आमच्या किडन्या विकल्या तरी आम्ही आमदार होऊ शकणार नाही. असे सांगत एखादा मंत्री झाला आणि कालांतराने त्याचे मंत्रीपद गेले तर या दोन्ही भूमिका बजावताना तो कसा वागतो हे त्यांनी मिश्किल शब्दात सांगितले.
यावेळी आमदार नरके यांनी, आपल्या बाबतच्या आलेल्या चांगल्या बातम्यांमुळे आपण हुरळून जात नाही.मात्र एखादी विरोधी बातमी आली तर ती आमच्या डोळ्यात अंजन घातल्यासारखे असते.मिळालेल्या पदाला मोठे करण्याची जबाबदारी ही त्या व्यक्तीमध्येच असते.असे आमदार नरके म्हणाले.