कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर विभाग आणि कोल्हापूर जिल्हा यांचा संयुक्त उल्हास मेळावा नुकताच डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठ वडगाव येथे उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या सुरुवातीला इचलकरंजी मनपा प्रशासन अधिकारी पटेल यांच्या चमूने साक्षरतेवर आधारित थीम साँग गायले.
मेळाव्यामध्ये डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक योजना, पुणे यांनी साक्षरतेचे महत्व पटवून दिले. शिक्षण हा घटनेने दिलेला हक्क आणि अधिकार असून असाक्षर व्यक्तींना साक्षर करणे हे आपले कर्तव्य आहे. नियमित दाखल विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच असाक्षर व्यक्तींनाही शिकवणे हे काम सर्व शिक्षकांनी करणे क्रमप्राप्त आहे.
कोल्हापूर विभागाचे विभागीय उपसंचालक महेश चोथे यांनी प्रास्ताविकात नवभारत साक्षरता कार्यक्रमाची माहिती सांगितली. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त नोंदणी करुन साक्षरतेचे वर्ग सुरु करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर नवसाक्षर आणि स्वयंसेवक यांचे सत्कार आणि मनोगते झाली. ज्येष्ठ नवसाक्षर बाजीराव पाटील यांनी साक्षरतेचे गीत सादर केले. उल्लास ॲपवर उद्दिष्टापेक्षा जास्त नोंदणी केलेले सिंधूदुर्ग, सांगली, सातारा या जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी तसेच चंदगड आणि करवीर तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
चंदगड तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी 100 टक्क्या पेक्षा जास्त उद्दिष्ट कसे साध्य केले हे स्पष्ट केले. साक्षरतेच्या दिलेल्या विषयावर विभागातील 5 जिल्ह्यांचे प्रत्येकी दोन स्टॉल तर कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांचे, कोल्हापूर मनपा, इचलकरंजी मनपा यांचे प्रत्येकी दोन स्टॉल असे एकूण 38 स्टॉल्स लावण्यात आले होते. दुपार सत्रात जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या साक्षरतेवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
यावेळी प्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाधिकारी योजना अनुराधा म्हेत्रे यांनी आभार मानले. मेळाव्यास श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ पेठ वडगावचे अध्यक्ष गुलाबराव पोळ आणि सचिव विद्या पोळ यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, शिक्षणाधिकारी योजना कार्यालयाचे सहाय्यक योजना अधिकारी केतन शिंदे, लघुलेखक राज म्हैंदरकर, जोंधळे उपस्थित होते.