मुंबई : जपानची बुलेट ट्रेन म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध शिंकन्सेन ट्रेनचे दोन संच जपानने भारताला देण्याची घोषणा केली आहे. भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ही एक महत्त्वपूर्ण घोषणा आहे.
पर्यावरणीय डेटा संकलित करण्यासाठी वापर.
हे ट्रेन संच मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरच्या चाचणीसाठी वापरले जातील. जपान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या ट्रेन संचांचा उपयोग ट्रॅक आणि ऑपरेशनल स्थितीची चाचणी करण्यासाठी आणि भारतातील बुलेट ट्रेनवरील पर्यावरणीय आव्हानांवर आधारित डेटा संकलित करण्यासाठी केला जाणार आहे.
जपानची बुलेट ट्रेन
शिंकन्सेन ट्रेन ही जपानमधील उच्च-गतीची रेल्वे प्रणाली आहे. जी जगभरात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वेगासाठी ओळखली जाते. शिंकन्सेनचा अर्थ “नवीन गती रेल्वे” असा आहे. जपानमधील या ट्रेनला “बुलेट ट्रेन” म्हणून देखील ओळखले जाते. कारण त्याचा आकार बुलेट सारखा असतो आणि ती अत्यंत जलद गतीने धावते.
पर्यावरण पूरक ट्रेन
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोर हा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी जपानने ई5 आणि ई3 शिंकन्सेन सीरीजच्या ट्रेन संचांची निवड केली आहे. या दोन मॉडेल्सच्या ट्रेन्ससाठी विशेष निरीक्षण उपकरणे बसवली जातील. ज्यामुळे उष्णता आणि धुळीवर उपाययोजना करणे सोपे होईल. भारतातील अधिक तापमान आणि धुळीच्या समस्येमुळे ट्रेन आणि इतर वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतो. शिंकन्सेन ट्रेनच्या चाचण्या या समस्यांचा सामना करण्यासाठी आणि त्या सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
जपान सरकारच्या या निर्णयामुळे भारताला बुलेट ट्रेन उच्च-गती रेल्वेच्या ऑपरेशनल चाचणी आणि पर्यावरणीय स्थितीचा योग्य डेटा मिळवता येईल. जे भविष्यात भारतातील बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाच्या विकासास मदत करेल.या ट्रेन चे वैशिष्टये म्हणजे ही ट्रेन पर्यावरणीय पूरक आहे. तसेच जलद गती आणि वेळेवर प्रवास करून लोकल आणि आंतराष्ट्रीय रस्त्यांना जोडतात.