कोल्हापूर (अमृता बुगले) : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. या नवरात्रोत्सवात आदिमायेची, नवदुर्गांची मनोभावे पूजाअर्चा आणि आराधना केली जाते. नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. ठिकठिकाणी अनेक उपक्रम राबविले जातात. काही ठिकाणी विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. मात्र, स्त्री शक्तीचा सन्मान हा फक्त 9 दिवसचं असतो का..? आपल्या इच्छा – आकांक्षा बाजूला ठेऊन अहोरात्र आपल्या कुटुंबासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी झटणारी ती स्त्रीच असते ना… तरीही आपण मात्र तिचा आणि कष्टांचा खरचं आदर करतो का..?


आपण समाजात वावरत असताना खरचं तिचा आदरसन्मान जपतो का..? तिला आदर देतो का..? घर, शाळा, मंदिर, हॉस्पिटल, कामाच्या ठिकाणी ती असुरक्षित का असते..? नातेसंबंधांतही ती सुरक्षित नसल्याचं पहायला मिळत आहे. सध्या अनेक लहान लहान चिमुकल्यांवर, महिलांवर, तरूणींवर अत्याचाऱ्याच्या धक्कादायक घटना घडत असलेल्या समोर येत आहेत. इवल्याशा कळ्या उमलण्याआधीच गळून पडून काळोखाच्या अंधारात कधीच न परतण्याच्या मार्गावर निघून जाताना दिसत आहेत. काही तरूणी पंखामध्ये भरारी घेण्याआधीच फक्त कोणाच्यातरी हव्यासापोटी,लालसेपोटी अलगद जाळयात सापडून शिकार होताना दिसतात.


देशात कायदा, सुव्यवस्था असतानाही संतापजनक कृत्ये घडताना दिसत आहे. यांना आळा घालण्यासाठी ठोस अशी कायदा सुव्यवस्था का नाही..? कधीपर्यंत हव्यासापोटी चालणार अशी कृत्ये पाहायचीत , अजून किती ही दृष्यकृत्ये घडत राहणार..? किती दिवस त्या मेणबत्त्या पेटवून आणि बंद पुकारून समाधान मानत राहायचं. हे अत्याचार किती दिवस चालणार. ज्या आदिशक्तीची पूजा करता ती पण एक स्त्रीच आहे ना.. त्या स्त्रीची पूजा करता… मग या स्त्रीचं काय..? असा प्रश्न सातत्याने पडत आहे.