कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज 12 डिसेंबर रोजी जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदासाठी शेवटची लढत घेण्यात आली. यामध्ये भारताच्या डी.गुकेशने अजिंक्यपद पटकवात त्याने विश्वविजेत्याचा किताब पटकावला. आजच्या सामन्यातील क्लासिकल 14 वा म्हणजेच शेवटचा डाव, हा डाव निर्णायक ठरणार होता. कारण आजपर्यंत दोघांचे सात-सात असे समान गुण झाले होते आणि आज जिंकेल तो जागतिक विजेता ठरणार होता. नाहीतर 13 तारखेला टायब्रेकरवर चार जलद डावांच्या आधारे विजेतेपद निश्चित केले जाणार होते. त्यामुळेच भारतीय तसेच जगातील सर्व बुद्धिबळ प्रेमींचे लक्ष या लढतीकडे प्रचंड उत्सुकतेने लागून राहिले होते.
डिंग लिरेनकडे आज पांढऱ्या सोंगट्या होत्या. त्याने डावाची सुरुवात N f3 या खेळीने रेटी ओपनिंग या प्रकाराने केली. गुकेशने त्यास d5 या खेळीने उत्तर दिले. तेराव्या खेळी अखेर दोघांनी राजाच्या बाजूस आपले किल्लेकोट पूर्ण केले. गुकेशच्या सतराव्या B e6 या खेळी नंतर दोघांची डाव वाढ पूर्ण झाली. दोघांची पटावर समान स्थिती आणि दोघांना समान संधी असे चित्र निर्माण झाले. मात्र गुकेशच्या b5 या खेळीमुळे डावात डिंगला जास्त विचार करणे भाग पडले. नंतर मोहऱ्यांची अदलाबदल झाल्यानंतर गुकेशच्या b5 या खेळीनंतर पटावर साधारण पुन्हा समान परिस्थिती निर्माण झाली. पुढे वजीरावजीरी झाल्यानंतर दोघांकडे समान सैन्य शिल्लक राहिले. गुकेशकडे राजाच्या बाजूस एक प्यादे जास्त राहिले पण गुकेशला जिंकण्यासाठी त्याचा फार फायदा होईल असे वाटले नाही.
त्यामुळे पुन्हा एकदा हा डाव अनिर्णित राहणार अशी शक्यता निर्माण झाली. पुढे दोघांकडे एक एक हत्ती व एक उंट पटावर होते, त्यातून पुढे गुकेशने जिंकण्यासाठीच्या जिद्दीने खेळ चालू ठेवला. वेळेच्या बाबतीत डिंग लिरेन किमान 35 मिनिटे गुकेश पेक्षा मागे होता. परंतु 40 खेळ्या पूर्ण झाल्यानंतर डिंग लिरेन वेळेच्या दडपणाखाली राहिला नाही आणि गुकेशकडे जिंकण्यासाठी ज्यादा असलेले एक प्यादे हे पुरेसे नव्हते, त्यातून गुकेशने काही खेळ्या करून डावात प्रगती करण्याचा प्रयत्न केला. परंतु डिंग लिरेनने योग्य बचाव करत डाव पुढे चालू ठेवला. पण शेवटी गुकेशच्या प्रयत्नाला यश आले.
लिरेनने केलेल्या चुकीच्या वेळी हत्तीच्या अदलाबदलीमध्ये गुकेशला उंटाची अदलाबदल करण्याची संधी मिळाली आणि येथे बाजी पलटली. अंतिम पर्वातील दोन विरुद्ध एक प्यादे अशी परिस्थिती पटावर निर्माण झाली आणि डिंगने आपली हार मान्य केली. डिंग लिरेनच्या घोडचुकीमुळे त्याचा निराशाजनक पराभव झाला. आणि डी. गुकेशने अजिंक्यपद पटकावत त्याने विश्वविजेत्याचा किताबही पटकावला.
अठरा वर्षाचा डी गुकेश हा जगातील अठरावा विश्वविजेता ठरला! तसेच विश्वनाथ आनंद नंतर विश्वविजेता होणारा तो दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला. या विजयामुळे आता शालेय बुद्धिबळ कुमार खेळाडूंना प्रेरणा मिळून भारत बुद्धिबळामध्ये लवकरच जागतिक महासत्ता ठरेल हे नक्की!
(धनंजय इनामदार)
आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू व बुद्धिबळ अभ्यासक, पुणे