कळे ( प्रतिनिधी ) : चॅम्पियन ट्रॉफी 2025 भारत विरुध्द न्यूझीलंड हा रविवार दि. 9 रोजी. ऐतिहासिक क्रिकेटचा सामना झाला. जगाचे लक्ष वेधून घेणारा आणि उत्कंठा वाढवणारा हा सामना होता. भारताने मोठ्या शिताफीने आणि आपले कौशल्य दाखवून हा सामना जिंकला. भारत वासियांनी आनंदोत्सव साजरा केला. काहींचा आपल्या भारतीय संघावर विश्वास होता, तर काहींनी पैजा लावल्या होत्या. 

मात्र एका क्रिकेट शौकीन तरुणाने चक्क भारतानेच सामना जिंकावा यासाठी नवस केले. सामन्याच्या आदल्या दिवशी पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील जोतिर्लिंग देवालयास नवस बोलून सामना जिंकण्याची ईच्छा व्यक्त केली आणि संपूर्ण गावाला पेढे वाटण्याचे देवाजवळ कबूल केले. त्याची ईच्छा पूर्ण झाली. भारताने सामना जिंकला आणि रविवारी कोल्हापूरच्या प्रदीप लांबोरे या श्रद्धाळू क्रिकेट प्रेमिने प्रदीप गुरव या मित्राच्या मदतीने सावर्डे जोतिर्लिंग देवालयात आणि गावात सर्वांना पेढे वाटले. विभागात मात्र हा विषय कौतुकाचा ठरला.