कोल्हापूर (प्रतिनिधी ) – दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. ऐन सणासुदीत खाद्यतेलाचे भाव वाढल्याने स्वयंपाक घरातील फोडणी महागली असून, सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. खाद्य तेलाच्या दरात किलो मागे तब्बल 25 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. तर तेलाच्या डब्यामागे सरासरी 150 ते 200 रुपयांनी वाढ झालेली दिसून येत आहे.

केंद्र सरकारने कच्च्या व रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात 20 रुपयांनी वाढ केली आहे. सोबत दोन टक्के सेल्स असे 22 टक्के वाढ झालेली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात 20 टक्के वाढ, तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 35.75 टक्के वाढवले आहे, तर खाद्यतेलात अचानक किलोमागे 25 ते 30 रुपयांची वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सूर्यफूल जुना दर 1,750 रुपयांचा डब्याचा होता, आताचे दर 2,140 रुपये, सोयाबीन डब्याचा जुना दर 1,600 रुपये व आताचे दर 2,050 रुपये, पाम तेल जुना दर 1,600 व आताचे 1,850 रुपये दर आहेत.

खाद्य तेलासोबत दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या डाळी, साखर आणि सुकामेवा आदींच्या किंमतीही वाढल्या आहेत.