कुरुंदवाड(प्रतिनिधी) : भविष्यात युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याशिवाय ग्रामीण भागातील जीवन सुखी व समृद्ध होणार नाही.युवकांना कामाच्या संधी मिळाव्यात म्हणून औद्योगिक विकास आणि औद्योगिक वसाहतींची गरज आहे, असे स्पष्ट प्रतिपादन आ.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आकिवाट येथे विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात केले.आकिवाट आणि टाकळी परिसरात औद्योगिक वसाहत उभी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.यासोबतच त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, औद्योगिक वसाहतींच्या स्थापनेदरम्यान कोणाच्याही घरचे नुकसान होणार नाही.”माझा शब्द आहे, कोणाच्याही घरची वीट हलवली जाणार नाही,” असे सांगून त्यांनी विकास प्रक्रियेत लोकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले.

यड्रावकर म्हणाले, “ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांना, विशेषत: महिलांना, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतींची नितांत गरज आहे.” ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या समस्येवर उपाय म्हणून औद्योगिक विकास हा प्रभावी उपाय होऊ शकतो.त्यामुळे तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी मिळतील आणि त्यांना शहरांमध्ये स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही.आकिवाट येथे 9 कोटी 67 लाख 80 हजार रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी आ.यड्रावकर बोलत होते.प्रारंभी ॲड.अरुण कलण्णावर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.त्यानंतर पापा चौगुले यांनी आपल्या मनोगतातून आ.यड्रावकर यांच्या कामाचे कौतुक केले.ग्रा.प.सदस्य शितल हाळिगळे यांनी विकास कामांबद्दल कौतुक करताना आ.यड्रावकर यांचे अभिनंदन केले.

विशाल आवटी यांनी आकिवाट गावात मागील पाच वर्षांत झालेल्या विकासकामांचा आलेख सादर केला.त्यांनी होणाऱ्या विकासकामांबद्दलही माहिती दिली.या कामांची पुढील योजना कशी असेल, याबाबत त्यांनी यड्रावकर यांच्या समोर सविस्तर मांडणी केली.उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी स्थानिक व राज्य सरकारचे सहकार्य आवश्यक असल्याचेही यड्रावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.”औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी शासकीय परवानग्या आणि योजना मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.आमच्या ग्रामस्थांना आणि तरुणांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत,” असे ते म्हणाले.यावेळी आ.यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.