हातकणंगले ( प्रतिनिधी ) – लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी तालुका हातकणंगले या डोंगर कपारीत वसलेल्या गावात सध्या तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे विहिरी आणि बोरवेल पूर्णपणे आटलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांना मैलो मैल पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जनावरांचे ही प्रचंड हाल होत आहेत. गावाला टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे असताना प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेतलेली नाही.

लक्ष्मिवाडी च्या सरपंच शुभांगी ढोल, उपसरपंच आक्कताई खोत , माजी उपसरपंच कृष्णा झलग, बिरदेव वाडीच्या उपसरपंच धोंडीराम कागदे तसेच बाळासो नाईक, सुरेश नाईक, मोहन ढोल, तातोबा हांडे, सुरेश खोत, चंदू खोत यांच्या पुढाकाराने गावाची पाणी टंचाई हातकणंगले तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देऊन टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा यासाठी दोन महिन्यापूर्वी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे.

निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले, जिल्हा अधिकारी कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडेही निवेदन दिले आहे. हातकणंगले विधानसभेचे विद्यमान आमदार राजू बाबा आवळे, माजी आमदार सुजित मिणचेकर यांनाही गांभीर्य पटवून दिले आहे. प्रशासन मात्र निवडणुकीच्या कामात दंग असल्यामुळे टाळाटाळ करत आहे.

नागरिकांची मात्र अपुऱ्या पाण्याअभावी ससे होलपट होत आहे. शेतीच्या हंगामाचे दिवस आहेत पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. खासगी पाण्याचा धंदा तेजीत आला आहे. एका पाण्याच्या टँकर ची किंमत दीड ते दोन हजार रुपये आहे. सर्वसामान्य माणसाला हे परवडणारे नाही. प्रशासन आणि लोप्रतिनिधी यांनी परिस्थिती गांभीर्याने घेऊन लक्ष द्यावे.