नाशिक ( प्रतिनिधी ) : देशात 4 ठिकांणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. त्यातील एक म्हणजे नाशिक. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जोपर्यंत गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होत नाही तोपर्यंत गोदावरीत स्नानासाठी बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. तर गोदावरी संवर्धनासाठी मास्टर प्लन केला जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
नाशिमध्ये दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा 2027 ला भरणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच नियोजनाला सुरुवात झाली आहे. ज्या गोदावरीच्या सान्निध्यात कुंभमेळा भरतो, त्या गोदावरीची प्रदूषणापासून मुक्तता जो पर्यंत होत नाही, तोपर्यंत गोदावरी नदीत स्नानासाठी बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. मागील कुंभमेळा काळात देखील गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला होता, त्यावेळी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गोदावरीचे पाणी मानवी आरोग्यास हानिकारक असल्यानं स्नानासाठी बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि सूचनांचे पालन अद्यापही केले नसल्याची खंत पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.