पुणे (प्रतिनिधी) : मंगळवारी गुकेशने जिंकण्याची संधी गमावल्यानंतर बुधवीरच्या खेळामध्ये डिंग लिरेन यांनी पांढऱ्या सोंगट्या घेऊन डावाची सुरुवात इंग्लिश ओपनिंग या प्रकाराने केली. या त्याच्या खेळीला उत्तर देताना गुकेशने सातव्या खेळीस f6 ही पूर्णपणे नवीन खेळी करून डिंग लिरेन यास गोंधळात टाकले. आजपर्यंतच्या बुद्धिबळाच्या उच्च लढतीमध्ये या प्रकारच्या खेळांमध्ये f6 ही सातवी खेळी ही कोणीही खेळलेली नव्हती. या खेळीवर उत्तर शोधण्यास डिंग लिरेनला खूप वेळ विचार करणे भाग पडले. त्यांनी यावेळी किल्ले कोट करणे पसंत केले.
पुढील काही खेळ्यामध्ये गुकेशनेही राजाच्या बाजूस किल्ले कोट पूर्ण केला पंधराव्या खेळीच्या अखेरीस वेळेबाबत गुकेश 30 मिनिट घड्याळामध्ये आघाडीवर होता. डिंगच्या सोळाव्या R e4 या वेगळ्या खेळीस गुकेशने N a6 ही खेळी करून आपली डाववाढ पूर्ण केली. डी गुकेशच्या 19व्या N e5 या खेळीमुळे त्याच्या सर्व सोंगट्या आता कार्यक्षम झाल्या. डिंग लिरेनचा e4 या ठिकाणी असलेला हत्ती आता अडचणीत येतो की काय अशी शंका निर्माण झाली. हा दबाव दूर करण्यासाठी लिरेनने N f3 ही खेळी करून दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु गुकेशच्या b4 या 23व्या खेळीमुळे वजीराच्या बाजूस दोन प्यादी आणि a फाईल मधील लिरेनचे दुसऱ्या पट्टीतील कमकुवत प्यादे हे लिरेनसाठी डोकेदुखी ठरले. त्यामुळे अंतिम पर्वात गुकेशला आश्वासक परिस्थिती निर्माण झाली.
गुकेशला या खेळातून दोन जोडलेली बढत प्यादी मिळाली खरी मात्र c5 येथे आलेला त्याचा घोडा अडचणीत सापडला. या परिस्थितीचा फायदा घेत लिरेन डिंगने मोहऱ्यांची अदलाबदल करताना आपल्या घोड्याच्या बदली गुकेशचा हत्ती मिळवला. शेवटी झालेल्या थरारक खेळांमध्ये दोघांच्या बाजूने वर खाली परिस्थिती निर्माण झाली.
गुकेशचे a फाईल चे प्यादे टिकू शकले नाही. त्यामुळे गुकेशच्या विजयाची संधी संपली. पुढे b7 च्या प्यादयासाठी डिंग लिरेनला घोड्यासाठी हत्ती द्यावा लागला. त्या अगोदर दोघांचे वजीर पटावरून गेले होते. त्यामुळे अंतिम परिस्थितीमध्ये दोघांकडे विरुद्ध रंगाचे उंट शिल्लक राहिले आणि डाव पुन्हा अनिर्णित राहिला. दोघांना अर्धा अर्धा गुण मिळाला.
आता मालिकेमध्ये दोघांचे प्रत्येकी चार चार गुण झालेले आहेत. दोघेही अजून पर्यंत बरोबरीच्या स्थितीत असले तरी, गुकेशची जिंकण्यासाठी असणारी जिद्द त्याला पुढील खेळात जमेची बाजू ठरेल असे वाटते. तसेच आज खेळताना आता गुकेशकडे पांढऱ्या सोंगट्या आहेत. या बुद्धिबळ खेळाचे विश्लेषण धनंजय इनामदार यांनी केले आहे.