कोल्हापूर – गणेश चतुर्थी होताच नवरात्रीची लगबग सुरू होते. नवरात्री हा नऊ रात्रींचा सण असून त्याच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते. आपल्या शेतातील माती आणून त्यामध्ये वेगवेगळे धान्य टाकून पळसाच्या पानावर घटाची स्थापना केली जाते. हा घट आठ दिवस ठेवला जातो आणि नवव्या दिवशी घटाचे विसर्जन केले जाते. घटस्थापनेला शेतीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.

घटस्थापनेचे काय आहे महत्त्व?

शेतात पिकं व्यवस्थित येईल का? तसेच शेतात पुरेस पाणी आहे का? पिकाची उगवण क्षमता चांगली राहिल का? हे पाहण्यासाठी घटस्थापना केली जाते. घटस्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्याआधी केली जाते. बियाणे, माती, पाणी आणि हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक परंतू, शास्त्रीय दृष्टीकोण असणारी पद्धती आहे.

घट नऊ दिवसच का बसवतात?

बीजांना रूजून अंकुर बाहेर पडण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी पुरेसा असतो. घटनस्थापना करताना एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. घटामधील बियाणांची उगवणक्षमता रोज तपासली जाते. या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणी बिज परिक्षण जसे होते त्याच बरोबर या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे याचे पण परिक्षण देखील केले जाते. यासाठी घट हा नऊ दिवसांचा बसवला जातो.