चंद्रपूर (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या वनिता जितेंद्र राऊत या महिला उमेदवाराने खासदार म्हणून निवडून आल्यावर गाव तिथे बियर बार सुरू करून बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे अजब आश्वासन दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे या महिला उमेदवाराने खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून अखिल भारतीय मानवता पक्षाकडून निवडणूक लढवीत असणाऱ्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

तर गाव तिथे दारूचे दुकान असे धोरण असून समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणे ही फार मोठी चूक असल्याचे त्या म्हणतात. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा दारुसाठी प्रसिद्ध आहे. बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी ही महिला उमेदवार थेट बिअर बारचा परवाना देणार आहे, असे आश्वासन देत त्या फिरत आहेत.

त्यांनी यापूर्वी नागपूर येथून २०१९ ची लोकसभा, २०१९ मध्ये चिमूर विधानसभा निवडणुक लढवली आहे. दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यावेळी जिल्ह्यात दारुबंदी होती. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी उठवून ठिकठिकाणी दारूचे दुकाने उघडण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली होती.