आजरा (प्रतिनिधी) : सध्या बेसुमार वृक्ष तोड आणि उद्योग इंडस्ट्रिज मुळे वृक्ष नष्ट होत आहेत. त्यामुळे पर्यावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईड याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्लोबन वार्मिंग वाढून तापमान वाढ होत आहे. अनेक रोगराईला सामोरे जात आहोत. त्यामुळे मानव जातीला वाचायचे असेल तर वृक्ष संवर्धन गरजेचे आहे. असे मत वनस्पतीशास्त्र प्रमुख प्रा. मधुकर बाचूळकर यांनी हारूर ता. आजरा येथील फलोद्यान पार्क येथील कार्यक्रमात व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवेदना टीम आजराचे डॉ. प्रविण निंबाळकर होते यावेळी बोलताना पुढे म्हणाले, आपला देश अनेक जैविक वनस्पती पासून समृद्ध आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास आपल्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शतकोटी वृक्ष लागवड झाली मात्र त्यातील वृक्ष किती जगले याची नोंद शासन दरबारी नाही ही शोकांतिका आहे. प्लास्टिक वापरावर बंदी आहे मात्र निर्मितीवर का नाही? प्लास्टिक वापराने प्रदूषण होत आहे, ही बाब चिंतेची आहे.

किमान एका व्यक्तीने आपल्या देशात एक तरी झाड लावले आणि जगविले तर फार मोठे काम होईल मात्र याकडे बुद्धिजीवी नागरीकांचे दुर्लक्ष आहे. भविष्यात या समस्या अशाच राहिल्या तर ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येईल, यासाठी झाडे लावून ती जगविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी बेसुमार ऊस लागवड सोडून इतर पिके तीही सेंद्रिय पद्धतीने केली तर चांगले होईल अन्यथा पुढील पिढीला आपण काय देणार याचा विचार होणे गरजेचे आहे.

हारूर युवक आणि ग्रामस्थांनी राबविलेला फलोद्यान पार्क पाहून समाधान वाटल्याचे सांगितले. यावेळी सुरेश. प. रेडेकर, विलास सुतार, सुभाष पाटील, सयाजी सावंत ,अमोल रेडेकर यांच्यासह, महसूल अधिकारी प्रकाश जोशीलकर, गिरीधर रेडेकर ,महेश पाटील, तानाजी खाडे, भारती चव्हाण , वसंत सावंत, रावसाहेब नलवडे, प्रथमेश रेडेकर , संदीप रेडेकर यांच्यासह सरंबळवाडी हायस्कुलचे मुख्याध्यपक सुभाष गोरुले, शिवाजी विद्यालयचे शिक्षक परीतकर आणि धनगर सर आणि दोन्ही विद्यालयाचे विध्यार्थी उपस्थित होते. आभार अमोल रेडेकर यांनी मानले.